सरगम
कशाला शब्दांनो सतत भवती फेर धरतामनाला येईना अथक असला नाच करता
रिकाम्या गाभारी अविरत खुळी ज्योत जळते
किती गाणी गावी,सरगम तरी शेष उरते.
कधी माझ्या ओठी तरल हिरवी शीळ बनता
कधी श्वासांमध्ये मळभ-गहिरे मेघ भरता
फुलांसंगे काटे गहन तुमचे रान भलते
किती गाणी गावी, सरगम तरी शेष उरते.
सखीच्या ओठांनी हळुच तुमचे बीज रुजले
तसे चंद्रानेही नितळ तुमचे प्राण जपले
विराणी दु:खाची सुमन बनुनी स्निग्ध झुलते
किती गाणी गावी, सरगम तरी शेष उरते.
उभी यंत्रे येथे चिरडत पदी सूर्-लहरी
मला नांदू द्या रे दगड बनुनी सुन्न शहरी
कुठे आत्मा गेला?विकल हळवे रक्त झरते
किती गाणी गावी, सरगम तरी शेष उरते
No comments:
Post a Comment