Wednesday, April 6, 2011

मधुयामिनी

मनात नभ दाटले झुळुकते निळी पालवी
तनूत मधुयामिनी मदिर पैंजणे चाळवी
 ललाट -कलशातुनी बरसती सुधेच्या सरी
उरात घुमते जणू स्वगत गातशी बासुरी.

अशात बघ लागले नितळ चंदनाचे दिवे
सुगंधसलिलासवे उतरले फुलांचे थवे
स्वरात हळु माझिया मिळव तू स्वराला सखी
रतीस्तवन ऐकण्या थबकली निशा ही मुकी.

तुझे अधर स्पर्शता वितळले विरागी धुके
उदास मन तोषुनी उजळले शशीसारखे
मिठीत तुझिया सखी गगन्-स्वप्न ओथंबले
दिशा सकल लोपल्या,क्षितिजही इथे थांबले.

No comments:

Post a Comment