Wednesday, April 6, 2011

रिक्त

काळोखाने जगत भरले,लोपल्या सर्व वाटा
कालिंदीच्या तरल लहरी शांतल्या गीत गाता
माझ्या गेही फिकट हळवा दीप एकांत भोगी
दारामध्ये अडुन बसला सावळा कोण योगी?

जे जे होते प्रियतम मला,त्यागुनी रिक्त झाले,
माझ्या भाळी निखळ उरले शांत आकाश काळे
चैतन्याचा कलश उपडा अंगणी सांडलेला
श्वासांमध्ये अधिर उडण्या पारवा थांबलेला.

देण्याजोगे जवळ नुरले,सोड रे हट्ट आता,
देहाचे हे वसन गळता काय येणार हाता?
देता देता गगन अवघे,सावळ्या,मीच झाले
झोळीमध्ये विकल तुझिया फूल घे वाळलेले.

No comments:

Post a Comment