पूर
जलद भरूनि आले अंबरी गर्जणारेखिदळत हसती त्या संगती वांड वारे
चमकत बिजलीचा शूल ये विंधणारा
अविरत झरती या मत्तशा तीव्र धारा.
डम डम डमरूसा नाद येतो घनांचा
मरुतगण तराणा छेडती ताण्डवाचा
पडत झडत गाती व्रुक्ष पैशाच- गाणे
विखरुनि घर गेले,पाखरू दीनवाणे.
उसवत तट वाहे जान्हवी माजलेली
फुटुन बुडत जाते नाव ही गांजलेली
स्तवन्-कवन गंगे! ऐक या नाविकाचे
पळभर परिसावे बोलणे बालकाचे!
जिवलग मज होती, कोपली तीच भूते
विकल नगर सारे ग्रासशी तूहि माते?
कुठवर तगवावा जीव अंधारणारा
सदय बनुनि गंगे,गाठु दे ना किनारा!
No comments:
Post a Comment