Wednesday, April 6, 2011

भैरवी

सारे कल्लोळ निमाले,डोह झालासे आभाळ
वर शांतशी निळाई तळी साचलेला गाळ.
तारांवर रुंजणारे सूर परतून आले
गच्च भरोनि येऊन तानपुरे शांत झाले.
डोळ्यांतच थबकला मत्त मोर नाचणारा
आसवांना झेलवेना त्याचा गळता पिसारा.
कस्तुरीला शोधताना म्रुग स्वतःत शिरला
साद देत जानकीला राम जळात विरला.
कशी समजाऊ तुला पूर्णशुन्याची थोरवी
बघ उषेच्या ओठांनी रात्र गातसे भैरवी.

No comments:

Post a Comment